0





संस्थेची दृष्टी आणि उद्दिष्टे



संस्थेची दृष्टी ( VISION )


  • ग्राहकांची पहिली पसंद बनणे
  • ग्राहकांना निर्भेळ , शुद्ध , स्वादिष्ट व पौष्टीक पदार्थ उपलब्ध करून देणे
  • गरजू व गरीब महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे
  • महिलांचा उद्योगातील सहभाग वाढवणे




संस्थेची उद्दिष्टे ( MISSION)


  • माफक दरात दर्जेदार व पोषक पदार्थ देणे
  • मालाचा दर्जा सतत वाढवत राहणे
  • नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे
  • ग्राहकांची मते जाणुन बदल करणे
  • व्यवस्थापनात विधायक व प्रगतिशील दृष्टिकोन ठेवणे








शारदा उद्योग मंदीर: इतिहास



अमरावतीतील शारदा उद्योग मंदीर ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशाला परिचित आहे. नावाप्रमाणेच ही संस्था उद्योगाचे मंदीर आहे. सन १९५० साली श्रीमती ताराबाई पाध्ये यांनी गरीब व गरजू स्त्रियांना आर्थिक स्वावलंबी बनवून, त्यांचा आत्मसन्मान राखण्याच्या दृष्टीने सुरु केलेली ही संस्था ६८ वर्षांपासून निरंतर सेवा देत आहे.
श्रीमती ताराबाई पाध्ये या अमरावतीतील सुप्रसिद्ध आणि वऱ्हाडचे राजे म्हणून ओळखले जात असलेले दादासाहेब खापर्डे यांची नात आणि बाबासाहेब खापर्डे यांची मुलगी. बाबासाहेब हे सी. पी. अँड बेरार मध्य प्रांत मंत्रिमंडळात मंत्री होते त्यामुळे राजकारणाचं व समाजकारणाचं बाळकडू त्यांना मिळालं होत, पण त्यांचा ओढा राजकारणापेक्षा समाजकारणाकडे जास्त. सर्व जाती धर्मातील विधवा, परित्यक्ता तसेच दुर्बल मनस्क किंवा व्यसनी पती असलेल्या स्त्रियांवर आपल्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी असते त्यासाठी त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून रहावे लागते हे त्यांच्या लक्षात आले. अश्या स्त्रियांसाठी त्यांनी शारदा उद्योग मंदीर या संस्थेची स्थापना केली आणि त्यांच्या त्या आधारवड बनल्या.
त्याकाळी स्त्रियांमध्ये शिक्षणाचा फारसा प्रसार झालेला नव्हता त्यामुळे त्यांच्यातील अंगभूत गुण म्हणजे पाककला हे जाणून, त्याच आधारे त्यांना आर्थिक स्वावलंबी बनवायचे या उद्देशाने ताराबाईंनी शारदा उद्योग मंदिराची मुहूर्तमेढ रोवली. ताराबाई पाध्ये यांनी समविचारी सात स्त्रियांना घेऊन प्रत्येकी ५१ रुपये आजीवन सभासत्व फी घेऊन ही संस्था सुरु केली; म्हणजे सुरवातीचे भांडवल ३५७ रुपये. शिवणकाम व पेपरमिंटच्या गोळ्या बनविणे या कामाचे प्रशिक्षण देऊन उत्पादन करणे व त्याची विक्री करणे अशी कामाची सुरवात झाली. आज शारदा उद्योग मंदीर उत्पादन केंद्रात अनेकविध वस्तूंचे उत्पादन केल्या जाते व विक्री केंद्रात त्यांची विक्री होते. स्वच्छ या निर्भेळ उत्पादनांबद्दल लोकांचा आजही संस्थेवर विश्वास आहे.
प्रारंभी खापर्डे वाड्यातच उत्पादन व विक्रीचा हा उद्योग सुरु करण्यात आला नंतर अमरावतीचे तत्कालीन नगराध्यक्ष वीर वामनराव जोशी यांच्या सहकार्यामुळे १९५२ साली जयस्तंभ चौकातील जागा लीजवर मिळाली. सदर जागा पुढे २००५ मध्ये संस्थेने शासनाकडून विकत घेतली. पुढे १९५६ मध्ये मध्यरेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संस्थेला भेट दिली आणि संस्थेच्या कामांनी ते प्रभावित झाले. त्यांनी बडनेरा स्थानकावर कँटीन चालू करण्यासंबंधी सुचविले, हे एक मोठे आव्हान होते पण ते समर्थपणे पेलून ताराबाईंनी ६२ वर्षांपूर्वीच महिला सक्षमीकरणाचा प्रत्यय आणून दिला.


१९५२ मध्ये मध्यप्रांताचे मुख्यमंत्री मा. रविशंकर शुक्ला यांनी संस्थेला भेट देऊन इथल्या कामाचे कौतुक केले व मध्यप्रांतातर्फे आर्थिक मदत देऊ केली असता नम्रपणे नाकारून त्या ऐवजी कामाची मागणी केली, तेव्हा ६०० मच्छरदाण्या पुरवण्याची पहिली ऑर्डर मिळाली. त्यानंतर संस्थेच्या प्रगतीचा आलेख सातत्याने वाढत राहिला. १९७० ला नामदार वसंतरावजी नाईक यांनी संस्थेला भेट दिली व इथले काम पाहून संस्थेच्या विस्तारासाठी १५०००/- रुपये दिले ज्यातून १९७५ साली "अन्नपूर्णा" विभाग सुरु झाला यात १००-१५० महिलांना रोजगार मिळाला. शहरातील थकलेल्या, कामावरून आलेल्या, भुकेलेल्यांना माफक दरात अन्न भरवून त्यांचे तृप्त होणारे चेहरे हे अन्नपूर्णा विभागाच्या यशाचे प्रमाणपत्र आहे. सामाजिक भान असणाऱ्या ताराबाईंनी चॅरिटी म्हणून या विभागातर्फे गरीब रिक्षाचालक व भारवाहक (हमाल) यांना फक्त १ रुपयात, ४ भाकरी व भाजी देणे सुरु केले. त्यामुळे आमची अन्नपूर्णा म्हणजे खऱ्या अर्थाने गरिबांची "अन्नपूर्णा माता" झाली. या योजनेचा शुभारंभ श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते झाला होता. संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी नेहमीच जपली आहे. शासनाच्या दारूबंदी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊन शहर फेरी काढली. शासनाने "माहेर" ही योजना संस्थेला चालवायला दिली व ती संस्थेने यशस्वीरीत्या राबविली.
१९७७ ला कर्मचारी महिलांसाठी वसतिगृह सुरु केले. नोकरीमुळे घरापासून दूर राहावं लागणाऱ्या स्त्रियांनां घरासारखं वाटेल असं; ना नफा ना तोटा या तत्वावर सगळ्या सुविधा देणारं एक वसतिगृह; संस्थेनी सुरु केलं. पुढे त्यात विद्यार्थीनींसाठी सुद्धा जागा उपलब्ध करून देण्यात आल्या.
संस्थेच्या विकासासाठी सातत्याने झटणाऱ्या ताराबाईंचे ११ फेब्रुवारी १९८० दुःखद निधन झाले आणि सगळ्यांना आधार देणारी ही माऊली एवढ्या मोठ्ठ्या संस्थेचा ठेवा समस्त महिला वर्गाच्या सुपूर्द करून निघून गेली. शारदा उद्योग मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला पोरकं झाल्यासारखं वाटू लागलं. परंतु ताराबाईंच्या स्नुषा कुंदा पाध्ये यांनी पुन्हा संस्थेचे कामकाज सुरळीतपणे सुरु ठेवले. सद्यस्थितीत संस्थेचे १५० सभासद आहेत, दर ५ वर्षांनी संस्थेच्या कार्यकारिणीची निवडणूक होते. निवडणुकीमुळे अध्यक्षपद सुद्धा फिरते राहिले आहे.
संस्थेला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या व गौरविले त्यात प्रामुख्याने, डॉ. पंजाबराव देशमुख, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, तत्कालीन राज्यपाल पट्टाभी सीतारामय्या, अर्थमंत्री सी. डी. देशमुख ही नावे घेता येतील. संस्थेच्या हीरक महोत्सवाकरिता तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीने संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्या गेला. या प्रसंगी माजी राज्यपाल मा. श्री. रा. सु . गवई यांच्या हस्ते संस्थेच्या ब्रीद वाक्याचे विमोचन झाले. आमचे ब्रीद वाक्य, " क्रियासिद्धिः सत्वे भवति महतां नोपकरणे ॥ " अर्थात, महान व्यक्तींचं यश हे त्यांना उपलब्ध असलेल्या साधनांवर नाही तर त्यांच्या स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून असतं. पुरस्कार: १९९९-२००० साली संस्थेला "अहिल्याबाई होळकर पुरस्काराने" गौरविण्यात आले.


काही दुर्मिळ क्षण








All Rights Reserved © Sharda Udyog Mandir
Designed By Pawgi Infotech Services